श्री गुलाबराव महाराज सर्वाना उपलब्ध व्हावे

१९५३-५४ साली श्री गुलाबराव महाराजांचे शिष्योत्तम श्री सद्गुरू बाबाजी महाराज पंडित यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांच्या सहवासात ३-४ वर्षे राहिलो. १९६० पासून श्री गुलाबराव महाराजांच्या ग्रंथांचे प्रूफ रिडिंग करणे सुरु केले. या कामाचे फलित म्हणून मला पीएच. डी. मिळाली. महाराजांच्या कृपेने प्रूफ रिडिंगचे काम आज वयाच्या ८२ वर्षा पर्यंत चालूच आहे.

श्री बाबाजी महाराजांनी १९६४ साली ब्रह्मस्थानी प्रस्थान केले. त्या साली मराठीत एम. ए. केले. पुढे श्री गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर पीएच. डी.  साठी नागपूर विद्यापीठात आदरणीय प्रा. श्री. मा. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केली. त्यावेळी अनायसे आमचे घरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी यांचा विश्रामासाठी मुक्काम होता. त्यावेळी मी श्री गुलाबराव महाराजांवर प्रबंध लिहीत आहे, हे कळल्यावर त्यांना आनंद झाला. ते म्हणाले तू जे लिहिशील ते मलाही दाखवावे. त्यामुळे प्रत्येक प्रकरण झाल्यानंतर गुरुजी वाचीत असत. इतिहासाचे प्रकरणात वैश्विक हिंदु संस्कृती संबंधी महाराजांचे निर्णय वाचल्यानंतर ते म्हणाले ३००० वर्षांपूर्वी आर्य धर्माशिवाय जगात कोणताच धर्म नव्हता. हे महाराजांचे बोल अतिशय योग्य आहेत. यासंबंधी पाश्चात्यांची मते खोळसाड आहेत. त्यासंबंधी अभ्यासपूर्ण लिखाण करून भारताची नालस्ती करणार्यांना उत्तर द्यावयास हवे.

यानंतर श्री गुलाबराव महाराजांचा समन्वय विचार जगातील सर्व सामाजिक घटकांत बंधुभाव निर्माण करण्यास समर्थ आहे. तसेच भारतातील उत्तर, दक्षिण, आर्य, शूद्र, ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर इत्यादी परस्पर फूट पडणाऱ्या तत्वांना नाहीसे करणारा आहे.

या नंतर त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिले. ते म्हणाले – डरो मत, आगे बढो ।।

श्री गुरुजींच्या या प्रोत्साहन मुले मी गुलाबराव महाराजांच्या साहित्यावर लेखन करू लागलो. पुढे १९८१ साली महाराजांची जन्म शताब्दी आम्ही सर्वांनी मिळून साजरी केली. आणि पुढे जीवनशताब्दी डॉ. विजय भटकर,  श्री गोविंद देव गिरी यांच्या पुढाकाराने २०१५ साली संपन्न झाली. यात नारायण मोहोड यांनी अपार कष्ट घेतले. त्यामुळे सर्वत्र महाराजांच्या कार्याचा खरा परिचय होण्यास आरंभ झाला. चांदुरबाजार येथील श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम येथील कै. श्री. नानाजी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरला महाराजांची पालखी जाते. तेथे महाराजांचे मंदिर झाले. तसेच वृंदावन आणि हरिद्रवार येथे श्री. गोविंद देव गिरी यांनी मोठमोठे कार्यक्रम आणि प्रवचनमाला आयोजित करून जीवनशताब्दी साजरी केली.

मधुरा द्वैत  दर्शन या नावाने मुमुक्षु ने तरुण भारतात ४५ कॉलम लिखाण केले. (२०१५)

२०१५ मध्ये डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी महाराजांवर एक हजार संस्कृत श्लोकांचे महाकाव्य लिहून विक्रम केला. तसेच श्री. गोविंद देव गिरी यांनी वृंदावनच्या एका सत्व संपन्न संस्कृत पंडितांनी लिहिलेले दुसरे बाराशे संस्कृत श्लोकांचे महाकाव्य प्रकाशित करून आपली सेवा महाराजांचे चरणी अर्पण केली आहे.

महाराजांवर आजपर्यंत १३ पीएच. डी. चे प्रबंध लिहिल्या गेले आहेत.

महाराजांच्या विचारांना मिळणारा प्रतिसाद पाहून इंटरनेट मध्ये महाराजांचे ग्रंथ जगाला ऊपलब्ध व्हावेत या दृष्टीने आम्ही ही वेबसाईट तयार केली आहे. त्याचा उपयोग सर्व जगाला व्हावा येवढीच मनीषा !

डॉ. कृ. मा. घटाटे